अंतर्मन खुणावत आहे


अंतर्मन खुणावत आहे.



     एक दिवस असाच मनामध्ये असंख्य प्रश्नांचे काहूर घेऊन बाहेर पडलो. दुचाकीवर स्वार होऊन वाट दिसेल त्या दिशेने निघालो, वळणे वळणे घेत आणि ओबडधोबड रस्त्यावर चालून शांत , निर्जन, एकाकी आणि प्राचीन आशा शिवमंदिराजवळ येऊन थांबलो.
मनाला शांती मिळेल आणि प्रश्नांची उत्तरे ही मिळतील म्हणून मंदिरात जाऊ म्हटलं.
        प्राचीन पण मोडकळीस आलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. समोर गाभाऱ्यात नुकतीच कोणीतरी पूजा करून गेलं असावं, कारणं हवेत अजूनही त्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि शिवलिंगावर वाहिलेली पांढरी फुलं अजून टवटवीत होती. गाभाऱ्यातील दिवा मंदपणे तेवत होता.
गाभाऱ्यात जायची इच्छा नव्हती म्हणून सभामंडपात एका खांबाला टेकून बसलो. मंदिरातील गारवा मनाला शांती देत नव्हता मनातील प्रश्न अजूनही तसेच होते.
असे का.?? माझ्यासोबतच का..?? माझं काय चुकलं..??
का मलाच नेहमी अपयश..? का माझ्यासोबतच अडथळ्यांची शर्यत..??
'रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा' असा मी म्हणतोय खरं पण खरंच माझा रंग वेगळा आहे का..??
की मी ही केवळ सामान्य आहे..??
कुसुमाग्रज म्हणतात 'पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पण केवळ अपयश मिळत असेल तर लढून तरी काय उपयोग.
निराशा आणि केवळ निराशाच. का आमच्या पदरातच कायम अपेक्षा भंग..!
मग .!
आता काय.??
असं म्हणून मी निःश्वास टाकला.
गाभाऱ्यातील दिवा अजूनही शांतपणे तेवत होता, दिव्याचा मंद प्रकाशात शिवलिंग आणि गाभारा पूर्णपणे उजळून गेला होता. अनाहूतपणे न राहून मी उठलो.
देवाने आपलं काय बिघडवलं ..?
असं म्हणून गाभाऱ्यात जाऊन त्या शिवलिंगाला त्या महादेवाला डोळे मिटून नमस्कार केला..
आणि..!!
अचानक धीरगंभीर आवाज आला.
कुणीतरी आपल्याला काहीतरी बोलतोय असा भास झाला. पण मंदिरात तर कोणीच नव्हतं आणि शांतता तर इतकी की हृदयाचे ठोके कानाला ऐकू येतील.
मी डोळे उघडले. आजूबाजूला पाहिलं तर कोणीही नव्हतं. परत डोळे बंद केले तर पुन्हा काहितरी बोलल्याचा भास झाला. मी लक्षपूर्वक ते ऐकण्याचा प्रयत्न केला.
जणू त्या गाभाऱ्यात असणारी अदृश्य शक्ती माझ्याशी बोलत होती अगदी हळुवारपणे...
मी सर्वांगाचे कान करून तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला..
आणि आवाज आला..
काय झालंय..?
का एवढा दुःखी..?
एवढं काय आभाळ कोसळलं..?
दुःखाला तोंड दिल्याशिवाय सुख मिळत नाही हे माहिती आहे तुला.. तरीही इतकी निराशा.?
आयुष्यातील प्रत्येक वळण सारखे नाही त्यामुळे कठीण परिस्थिला सामोरे जावेच लागेल जिंकलास तर ठीकच पण हरलास तर नव्या उमेदीने पुन्हा सामोरे जाण्याची तयारी ठेव..
आणि
पटकन मी भानावर आलो..
घडून गेलेल्या घटनांचा कालपट माझ्या झरझर समोर आला. कुठंतरी वाचलं होतं 'लढल्याशिवाय जिंकत नाही आणि हार मानणे पुरुषार्थ नव्हे'
आणि हळूहळू उमगायला लागलं,
'शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्यात जन्माला आलोय आणि आपण हार मानावी हे आपल्याला  शोभत नाही'
कुणीतरी म्हटलंय,
'व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो
मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची'
बस्स झालं पराभव आणि अपयशावर रडणं आता नव्या उमेदीने लढलंच पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात केलीच पाहिजे . खचून जाणं हा पर्यायच नाही इथे..!!
तिथून उठलो गभाऱ्यातून बाहेर आलो थोडीफार उमेद मिळाली होती. प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हती पण थोडाफार आत्मविश्वास नक्कीच मिळाला होता सर्व प्रश्न डोक्यातून गेलेले फक्त एकच विचार डोक्यात होता..!
गाभाऱ्यात नक्की कोणाचा आवाज आपल्याला आला..?
कुण्या व्यक्तीचा..?
की ती देव म्हटली जाणारी अदृश्य शक्ती आपल्याशी संवाद साधून गेली..??
नसेल..
नक्की आपलं अंतर्मन खुणावत आहे...
आपलं अंतर्मनच खुणावत आहे..!!
-समाप्त
(काल्पनिक पण वास्तवाशी एकपरूप.!)
-संतोष अशोक तुपे.
Itihasmarg.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हंबीरराव मोहिते यांची तलवार

तळबीडचे मोहिते घराणे

मराठा लष्कर