तळबीडचे मोहिते घराणे




     महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मातब्बर सरदार घराण्यांनी स्वराज्यासाठी मोठी कामगिरी केली. वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचीहि आहुती दिली. आणि अशा मातब्बर सरदारांच्या कामगिरीतून आणि बलिदानातून शिवरायांचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले.
तळबीडचे मोहिते घराणेही त्यापैकीच एक.



मोहिते हे एक महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू घराण्यांपैकी एक. हे घराणे मुसलमानी आमदनीमध्ये उदय पावून मराठेशाही मध्ये प्रख्यात झाले. या घराण्यातील हंबीरराव मोहिते हे तर शिवकालीन इतिहासात प्रसिद्धच आहेत.

मोहिते घराण्याचा पुष्कळसा इतिहास उपलब्ध नाही आणि आहे तो अगदीच अल्प आहे.

★मोहिते घराण्याचा इतिहास

मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. हिंदुस्थानांत मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या होऊन दिल्लीचे हिंदू सार्वभौमत्व नष्ट झाल्यानंतर या घराण्याचे वंशज राजपुताण्यांत हाडोती प्रांतात राहिले ;  म्हणून त्यांस हाडे हे नांव पडले. पुढे हे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहांच्या कारकिर्दीत उदयास येऊन त्यांनी आपल्या रानशौर्याने बादशहास संतुष्ट केले त्यामुळे त्यांस बादशहाकडून मोठमोठया किताबती व राजचिन्हे मिळाली.
त्याच वेळी त्यांना ' मोहिते ' हा किताब मिळाला.

मोहिते हा शब्द अरबी भाषेतील असून त्याची उत्पत्ती मोहीम या शब्दापासून झाली आहे. ह्याचा अर्थ ' रण जिंकणारा ' किंवा ' विजयी ' असा आहे.

★ मराठ्यांच्या ९६ कुळी घराण्याच्या यादीतील मोहिते घराणे .

मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण

वंश - वेद =   सूर्यवंशी -ऋग्वेद

गादी = सांबरींगड रणथंब

निशाण = श्वेत

देवक - अष्टव

उपकुळे - मोहिते, वाकडे, पारदी, रणदिवे , कडू, डेरे, गव्हाणे , ढवळे, ताखेडे, हंबरराय, काशिद, भोर, नाईक, मालसिंगे, दुसिंगे, ढेरे, मते, ठोंबरे, चोथे, भापकर, नवले, चोहटमेल, अडसुले.

★ बाजी किताब

निजामशाहीत जी अनेक मराठा घराणी सेवारत होती , त्यातील मोहिते घराण्यातील रतोजी मोहिते या असामीचे नाव इतिहास नोंदवितो. निजामशाही चाकरीत रतोजीने जी मर्दुमकी गाजविली तीबद्दल त्यांना बाजी हा किताब मिळाला ..
हा किताब आजही तळबीड येथील मोहिते घराणे नावापुढे गौरवाने लावते.


★ मोहित्यांची वंशावळ

रतोजी मोहित्यांना दोन पुत्र एकाचे नाव संभाजी आणि दुसर्याचे नाव तुकोजी.

तुकोजी मोहित्यांचे संभाजी आणि धारोजी हे दोन पुत्र व तुकाबाई हि एक कन्या .
यातील संभाजी मोहिते याचा विवाह घाटग्यांची कन्या गंगाबाई आणि धारोजीचा विवाह घोरपडे यांच्या कन्या सुन्नाबाई यांच्याशी झाला .
 तर तुकाबाई यांचा विवाह शहाजी राजेंसोबत झाला.

तुकोजी मोहिते समाधी , तळबीड.


धारोजी मोहित्यना नेताजी आणि दीपाजी असे दोन पुत्र तर संभाजी मोहित्यांना हरिफराव , हंबीरराव आणि शंकरजी हे पुत्र आणि सोयराबाई व अण्णूबई या दोन कन्या होत्या.

संभाजी व धारोजी हे दोघेही अतिशय पराक्रमी होते . इ स. १६५२ साली शहाजीमहाराजांनी संभाजी मोहित्यांना आपल्या पुणे जहागिरीतील सुपे परगण्याचा सरहवालदार म्हणून नेमले . पुढे शिवाजीराजांनी पुणे जहागिरीचे प्रशासन करण्यास सांगितले . शिवाजी राजांनी स्वराज्यनिर्मिती करण्यास प्रारंभ केला, तोरणा , रोहिडा, चाकणचा किल्ला , हे स्वराज्यात आले .
स्वराज्याची इमारत उभी राहत असताना सुप्याच्या गढीत राहणारे संभाजी मोहिते हे शिवाजीराजांचे सावत्र मामा हे जुलमी, रगेल, लाचखाऊ अशा वृत्तीचे असल्याचे महाराजांना समजले आणि त्यांनी जाब विचारले असता ते उद्धटपणा करू लागले पुढे महाराजांनी त्यांना कैद केले आणि कर्नाटकी पाठवून दिले.
याबद्दल सभासद लिहितो,

' मग सुपेमहाल येथे कोणे एके जागा संभाजी मोहीता म्हणून सावत्र आईचा भाऊ, मामा होता. तो महाराजांनी महालावरी ठेविला होता. त्याचे भेटीस सिमग्याचे सनास पोस्त मागावयास म्हणून गेले. मामांस कैद करुनी ठेविले. त्याचे ३०० घोडे पागेचे होते व द्रव्यही बहुत होते . वास्तभाव ( साऱ्या वस्तू , मालमत्ता ) , कापड हस्तगत करून सुपे देश साधिला.. '

संभाजी आणि धारोजी हे अत्यंत पराक्रमी आणि शूर होते .त्यांच्या पराक्रमासंमंधी काही पत्रे ' ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ - आप्पासाहेब पवार ' यामध्ये दिलेली आहेत


धारोजी मोहिते यांनी प्राण पणास लावून राजसेवा केल्याचा उल्लेख १६३७ च्या एका पत्रात आला आहे त्यातील मजकूर असा..

      "आंबरखान नबल्ली याणी सर्व ज़ालेला मार लिहिला कि धारोजी राजे मोहिते याणी स्वामीसेवेस प्राण अर्पण करावा अशा प्रकारची सेवा करण्यात किंचितही अंतर केले नाही व धण्याचे चाकरीत जीव खर्च करावा यदर्थी काहीयेक बारीक विचार मनात न आणिता आंतर न करिता स्वामीसेवा करून दाखविली म्हणून लिहिले ते जाहीर जाले. त्याजवरून तुम्हास हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुम्ही सत्य जाणावे कि ही सेवा स्वामीचे मनोदयानुरूप तुम्ही केली. या उत्तम शेवेचे फळ दिवसेदिवस तुम्हास आदीक प्राप्त होऊन तुमची योग्यता वाढविली जाईल."
(संदर्भ- ताराबाईकालीन कागदपत्रे)


पुढे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती पदाचा मान मिळाला.
दक्षिण दिगविजयाच्या वेळी त्यांचे कर्तृत्व खरेखुरे उजळून आले.

शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांनी सैन्य एकत्र राखले व नंतर संभाजीराजेंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

त्यांचा मृत्यू  १६८७ साली सर्जाखानासोबत वाईजवळ झालेल्या लढाईत झाला.




 हंबीरराव मोहिते स्मारक , तळबीड.


★ तळबीडची पाटीलकी

इ स. १६२६-२७

शहाजी भोसले सरलष्कर यांचे विनंतीवरून संभाजी व धारोजी मोहिते यांना वसंतगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या  तळबीड व बालेघाट येथील देशागत मिळाली..
( ता. का. का. खंड १ पृ. २४)

★ मोहिते - भोसले सोयरसंमंध.

मोहित्यांची भोसल्यांशी सोयरिक झाली शहाजी राजेंच्या आणि तुकाई यांच्या विवाहापासून .
पुढे शिवाजी राजेंचा विवाह मोहित्याच्या कुळातील सोयराबाई म्हणजे हंबीरारावांच्या बहिणीशी झाला.
हंबीरारावांची दुसरी बहीण अण्णूबई हि एकोजी राजेंना दिली होती..

आणि हंबीरारावांची कन्या ताराबाई हि शिवाजी राजेंचे पुत्र राजाराम महाराज यांना दिली.
इतके जवळचे मोहिते - भोसले संमंध आहेत.

मोहिते घराण्यातील कर्त्या पुरुषांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण केले यात शंकाच नाही पण त्यांच्याबद्दल खूप अल्प माहिती इतिहासात उपलब्ध आहे..

।। लेखनसीमा ।।

संदर्भ -
१.मराठे सरदार.
 २.सेनापती हंबीरराव मोहिते - सदाशिव शिवदे
 ३.सभासद बखर
 ४. ताराबाईकालीन कागदपत्रे - आप्पासाहेब पवार
   ५. शिवाजी निबंधावली

संकलन
- ©संतोष अशोक तुपे

Comments

Popular posts from this blog

मराठा लष्कर

हंबीरराव मोहिते यांची तलवार