मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.
★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★
मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी)
वेळ दुपारी ४ वाजता..
ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.)
आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄)
तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली.
कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो.
डोंगर चढून उतरल्याने आणि पोट भरून जेवल्याने आम्हाला हळूहळू सुस्ती यायला लागली पाय चालायला नको म्हणाय लागले. आता काय करायचं मग आम्ही ठरवलं की तास - दीड तास विश्रांती घेऊ आणि परत मार्गाला लागू पण रात्र पडणार हे नक्की होत त्यातुन आमची माणसं चुकलेली आणि आम्ही मागं राहिलेलो.
काय करावं असं म्हणत आम्ही एका माणसाला विचारलं,
आम्ही:- रायरेश्वर किती लांब हाय ओ..?
ती व्यक्ती:- धा-पंदरा किलोमीटर आसल की..
आम्ही:- रस्ता कसला हाय.?
व्यक्ती:- डांबरी रस्ता हाय पायत्याच्या गावापर्यंत.
आम्ही:- धन्यवाद.
आता 10-15 किलोमीटर म्हणजे दोन-अडीज तास लय झालं म्हणून आम्ही विश्रांतीसाठी जागा शोधायला लागलो.
पण जागा काय मिळणा. प्रत्येक झाडाखाली कोण ना कोणतरी बसलेलं होतं.(साहजिकच दोन डोंगर चढून उतरणारे आणि भरपेट जेऊन विश्रांती घेणारे आम्ही एकटेच नव्हतो.)
शेवटी झाड मिळेना म्हणून एका घरामागे असणाऱ्या गवताच्या गंजीच्या सावलीत आम्ही बॅगा टाकल्या आणि आता 2 तास निवांत बसायचं (खरंतर झोपायचं) म्हणून मुक्काम मारला..😊
दोन तास मज्जा.
गंजीला टेकून आम्ही चारजण वर आभाळाकड तोंड करून आडवे झालो. शेजारी गव्हाचे रान, समोर भलमोठ्ठ बाभळीचं झाड, उजव्या अंगाला दिसणारा 'कमळगड' आणि वर स्वच्छ आकाश. आशा वातावरणात आम्ही निवांत पडलेलो.
जेवल्यामुळे झोप काय येत नव्हती मग हळूहळू गप्पा सुरु झाल्या.
3-4 दिवस सोबत राहिल्याने आम्हाला माहिती होतं आमचा 'रोह्या' लय निरागस त्यामुळं काय पण विचारल तरी फटाफट खरी खरी उत्तरं देतो मग काय आम्ही झालो सुरू मी आणि स्वागत दोघांनी प्रश्न सुरू केले आणि त्याची उत्तरं अशी कीं हसून हसून पुरेवाट झाली , पैलवान तर अक्षरशः हसत लोळत होता आणि त्याच्याकडे बघूनच आम्ही तिघे जोरजोरात हसत होतो🤣
(2 तासात अनेक किस्से झाले पण विषय पर्सनल असल्यानं सांगता येणार नाहीत😊)
विश्रांती घेऊन झाली होती आणि आता रायरेश्वर पर्यंत अंतर कापायचे होते त्यामुळे आम्ही मुक्काम हलवला.
एका घरातून आम्ही पाण्याने बाटल्या भरल्या आणि आता थांबायचं नाय अस म्हणून रस्ता धरला पण 2-3 तास नुसतं चालायचं तेही न थांबता हे कसं शक्य आहे..?
मग ठरलं की नुसतं चालायचं नाय तर शिवप्रतिष्ठान ची गीतं, श्लोक म्हणत चालायचं.(गीतांमुळं अंतर कापलेलं कळणार नाही आणि वेगही कमी होणार नाही याची आम्हाला खात्री होती म्हणा किंवा अनुभव होता म्हणा.😊)
आम्ही चालायला सुरुवात केली..
मी बॅगेतून 'राष्ट्रभक्तीधारा' पुस्तक काढलं.
पण सुरुवात करणार कोण..?
आम्हाला तर फक्त मागून म्हणायची सवय होती.
पण आमचा रोह्या म्हटला मी करतो सुरुवात आणि पुस्तक घेऊन रोह्यान सुरुवात केली.
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा..sss
भावानं दणदणीत महाराष्ट्र गीताने सुरुवात केली आणि आम्ही वेग धरला. रोह्या पुढं म्हणणार आणि आम्ही तिघे मागं म्हणणार..!!
रोह्या झालं की मी घेतलं..
धमक धमक धुसा बोले
झनक झनक झंजा बोले..!!
शेर शिवाजी की चली रे सेना , चली रे सेना..
स्वागत देखील शिवाजीसूर्यहृदय" मधील श्लोक घेत होता..
झपाझप पावले टाकीत आम्ही चालत होतो आणि रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला मागे टाकत होतो कारण आम्हाला माहिती होत जोश आहे तवर पल्ला मारायचा नायतर वेळ होणार..!!
आम्हला भेटलेले धारकरी आमच्या सोबत गीतं गात होते आम्ही चौघे एक रेषेत सरळ येताना पाहून आम्हाला वाट देत होते.
अहाहा काय वर्णन करावं म्हणायला तर आम्ही चौघेच होतो पण पूर्ण खड्या आवाजात गीतं म्हणत होतो.
बघता बघता रात्र झाली आणि गीतं दिसायची बंद झाली..
पण आम्ही इतक्या वेगात पल्ला मारला होता की रायरेश्वर चा पायथा अगदी जवळ आला होता.😊
आठविल तशी गीतं श्लोक म्हणत आम्ही रायरेश्वराच्या पायथ्याल पोहोचलो आणि निःश्वास टाकून थोडावेळ मांडी घालून बसलो..
पण बसल्यावर एकच विषय..
रोह्या:- शिवप्रतिष्ठान ची गीतं आणि श्लोक लाय जबरदस्त हायती लगा
स्वागत:- गाणी म्हणत म्हणत चालायला काय वाटलं नाय नायतर लय ताप झाला असता..
पैलवान :- मज्जा आली पण..
निवांत बसून पण लवकर आलो तस आपुन.
मी :- बॅग लय जड हाय पण गाण्यामुळ कळलं नाय नायतर मला काय जमलं नसतं.
एवढं बोलून सगळी शांत झाली.
पण सगळ्यांच्या डोळ्यांपुढं एकच दृश्य दिसत होतं.
"आम्ही खड्या आवाजात गीतं म्हणतोय आणि वाटेत भेटणारी आम्हाला वाट देतायत , काहीजण सोबत म्हणतायत पण आम्ही आमच्यातच मस्त गाणी म्हणतोय.."
!! शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना !!
!!शेर संभाजी की चली रे सेना, चली रे सेना!!
खरं सांगू,
या गीतांमध्ये आणि शिवाजी -संभाजी महाराजांच्या श्लोकांत किती ताकद आहे याचा खरा प्रत्यय त्यादिवशी आम्हाला आला.
(माझी पहिली धारतीर्थ मोहीम ,अनेक किस्से झाले त्यातील हा कधीही न विसरता येणारा किस्सा, माझ्या काठीचा(दंड) तर तुफान किस्सा आहे , वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहीन😊)
आम्ही धारकरी
- रोह्या (रोहित यादव) , पैलवान, स्वागत दौंडे आणि मी.
क्रमशः...
© संतोष अशोक तुपे.
(शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेतील एक धारकरी)
तुम्ही लय हुशार हायसा आे...
ReplyDeleteत्यातल्या त्यात स्वाग्या म्हनजे......😂😂
तुम्हासनी सोडल राव दंडाने ....
हितं सन्या पाहिजे हुता..😂
Delete