विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली
..विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली..
इतिहासात मराठ्यांची राजधानी असणारी ऐतिहासिक सातारा नागरी आणि सातारा जिल्हा संपुर्ण जिल्ह्यात मराठा इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे. अशाच मराठा इतिहासाच्या खुणा असणारे एक ठिकाण सातारा पासून चार किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर असल्यामुळे या गावाचे दोन भाग आहेत अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'.
संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाध्या नदीच्या काठी आहेत. याशिवाय प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात येथे एकूण दहा मंदिरे बांधली असून ती सर्व नदीच्या काठावर आहेत.
आज विश्वेश्वर मंदिराबद्दल बोलू बाकी मंदिराबद्दल परत कधीतरी लिहिनच.
..विश्वेश्वर मंदिर..
विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थानावर आहे. सातारा गेझेटिअर नुसार हे मंदिर १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे . नदीच्या बाजूने प्रवेश आलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहात असणाऱ्या शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे . गर्भगृहाच्या उंबरठ्यावर किर्तीमुख कोरलेले आहे.
अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ असून दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूने मोकळा आहे देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी च्या मुर्त्या आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत.मंदिरासमोर नंदीमंडप आहे त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा - वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो.
हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.
मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात.
(या समाध्या नक्की कुणाच्या याबद्दल अनेकांचे दुमत आहे)
- संतोष अशोक तुपे
#इतिहासमार्ग #राजधानी_सातारा #संगम_माहुली #विश्वेश्वर_मंदिर #कृष्णा_वेण्णा
Comments
Post a Comment