लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
// लोकशाहीर आण्णाभाऊ साठे //
'आण्णाभाऊ साठे' म्हटलं कि आठवते एक लावणी "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली" .
प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणं कठीण. नाहीतर , वाटेगावाच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला 'अण्णाभाऊ साठे" नावाचा मुलगा ज्याला वयाच्या १५-१६ व्या वर्षापर्यंत धड अक्षर ओळखही झालेली नव्हती ,तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवतो, 'फकिरा' या त्यांच्या बावनकशी कादंबरीची सोळा आवृत्ती निघते, मराठी व्यतिरिक्त भाषाही माहित नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो , आणि त्यांच्या साहित्यकृतींची भाषांतरे भारतीय नव्हे तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात . याचा अर्थ काय लावायचा.?
भाऊ मांगांच्या घरात जन्मलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले. समाज्याच्या अपेक्षेचे चटके सहन केले, वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगली, गिरणीकमगारांच्या हलपेष्टा आणि शोषण सोसले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतहि केली इतके अपार दुःख सोसलेल्या अण्णांची जिद्द मात्र प्रकर्षाने दिसून येते.
लोकशाहीर म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवलीच पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या पोवाड्यातून त्यांनी लोकजागृती केली.
मोरारजी देसाईंनी जेव्हा तमाशावर बंदी घातली तेव्हा अण्णाभाऊंनी तमाशाचे "लोकनाट्य" असे नामकरण केले.
पण त्यांनी फक्त नाव बदलले नाही तर तमाशाचे अंतरंग हि पार पालटून टाकले. प्रथम 'गणा' मध्ये त्यांनी मातृभुमि, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांना पहिला मान दिला.
उदा..
प्रथम मायभूच्या चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो । कवना।।
असे बदल करून त्यांनी राष्ट्रप्रेमाला साद घातलीच पण तमाशाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देखील दिली.
अज्ञानदासपासून ते तुळशीदासा पर्यंत अनेक शाहीर, पोवाडेकार महाराष्ट्रात झाले मग त्यात अण्णाभाऊंनी काय वेगळेपण दाखवले..?
" पोवाड्यातून केवळ वर्णनं करून वाडवडिलांच्या कहाण्या पद्यरूप ऐकविणे हे शाहिराचे काम नव्हे, तर शाहिरान जनमन सागरात सर्वभर संचार करून नव्हे , तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन त्यात चाललेल्या भावनाउद्रेकांचा अविष्कार आपल्या लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त करून अथवा जनमानस हेलावूनच नव्हे तर त्या सागराच्या कणाकणाला ऊब देऊन त्याच्या लाटांवर आरूढ होऊन गगणालाही गवसणी घालावी , तोच मराठी शाहीर " हि उक्ती सार्थ करणारे आण्णाभाऊ हे एकमेव शाहीर होत.
"लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त शत शत नमन .."💐
● संतोष अशोक तुपे.
#लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #जयंती #संयुक्त_महाराष्ट्र #707

Comments
Post a Comment